भडगावच्या विकासाला नवी दिशा; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महत्त्वाच्या विकास प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहराच्या भविष्यातील विकासाला गती देणाऱ्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. शहरातील वडधे, कराब, पेठ व यशवंतनगर परिसरातील शासकीय जमिनींसह अनेक प्रलंबित विकास विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध करून देणे आणि विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
बैठकीत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील काही जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भगोटाधारक ग्रामस्थांच्या जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्यासाठी योग्य जागा निश्चित करणे, तसेच थोर राष्ट्रपुरुष आणि महान विभूतींच्या स्मारकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून त्यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावावरही प्रशासनाने सकारात्मक चर्चा केली.
याशिवाय, भडगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या सुकी नदीच्या पात्रातील जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवून त्या ठिकाणी नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, मनोरंजन केंद्र आणि इतर विकासकामे उभारण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत महत्त्व देण्यात आले.
भडगाव शहराचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने कार्य करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बैठकीतील प्रस्तावांची अंमलबजावणी झाल्यास भडगावच्या विकासाला नवी गती मिळणार असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





