फायनान्स कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यानेच रचला लुटीचा कट; भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; पाच आरोपी जेरबंद, दोन फरार, मोटारसायकल जप्त
भडगाव प्रतिनिधी :
भडगाव शहरात भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून ₹५१ हजार ५६० रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली ₹२५ हजार किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या कारवाईमुळे भडगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांनी १० जुलै २०२६ रोजी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार, ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी भारत फायनान्स कंपनीची रोख रक्कम घेऊन जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्याकडील ₹५१,५६० रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान उदय छोटू गायकवाड (वय २२, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांसह चोरीचा कट रचल्याचे सांगितले. उदय हा यापूर्वी भारत फायनान्स कंपनी, भडगाव येथे कामाला असल्याने कंपनीच्या दैनंदिन रोख रकमेच्या वाहतुकीची, वेळेची आणि मार्गाची संपूर्ण माहिती त्याला होती. त्याच माहितीचा गैरफायदा घेत आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तपासात उघड झाल्यानुसार आरोपींनी दोन मोटारसायकलींचा वापर करून चोरीची योजना आखली होती. काही आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग केला, तर अन्य आरोपींनी योग्य संधी साधून रोख रकमेची बॅग हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी आपापल्या घरी निघून गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने उदय छोटू गायकवाड (वय २२, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), अनिल दिलीप पाटील (वय ३१, रा. पळासखेडा, ता. भडगाव, जि. जळगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (वय २६, रा. पूर्वीपाडा, ता. जि. धुळे), निलेश अण्णा पवार (वय २०, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) आणि योगेश प्रकाश पवार (वय २२, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) या पाच आरोपींना अटक केली आहे.
तर सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा, ता. भडगाव, जि. जळगाव) आणि हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक) हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा पोलीसांकडून कसून शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली ₹२५ हजार किमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(१) ची वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना. राहुल पाटील, पोकॉ. ईश्वर पाटील, पोकॉ. जितेंद्र पाटील, पोकॉ. भूषण पाटील व चापोकॉ. रिजवान शेख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






