n71891788517835701337079f35b5b263de8ebd70a40f38131e7d6629f06aed8df931df286af005af6a91f5

२५ कोटींच्या मानहानीच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे सडेतोड उत्तर; ‘सत्यावर आधारित सिनेमा प्रदर्शित होणारच.?

55 / 100 SEO Score

२५ कोटींच्या मानहानीच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे सडेतोड उत्तर; ‘सत्यावर आधारित सिनेमा प्रदर्शित होणारच.?

मुंबई, प्रतिनिधी :-

नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटावरून राजकीय आणि कायदेशीर वाद अधिकच चिघळला आहे. या चित्रपटात माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांच्यासह सुमारे ४० जणांना २५ कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला दीपाली सय्यद यांनी न्यायालयात उत्तर दाखल करत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना, “आम्ही कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू ठेवलेला नाही. चित्रपटात जे सत्य आहे तेच दाखवले आहे. जे घडलेले नाही, ते मी कधीही बोलले नाही. माझ्याकडून कोणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला नाही,” असे स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खरात यांच्यासोबत रुपाली चाकणकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली होती. त्यानंतर चित्रपटात चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेली भूमिका असल्याची माहिती समोर येताच त्यांनी मानहानीची कायदेशीर कारवाई सुरू केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात केवळ दीपाली सय्यदच नव्हे तर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे तसेच काही वृत्तवाहिन्या आणि इतर संबंधित व्यक्तींनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या नोटिशीचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे. “चित्रपटाचे सुमारे ७० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून, नियोजित वेळापत्रकानुसार येत्या २ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाईल. कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी दीपाली सय्यद यांनी अशोक खरात प्रकरणावरही कठोर भूमिका व्यक्त केली. “मी अशा जबाबदारीच्या पदावर असते, तर अशा भोंदूबाबांवर अत्यंत कठोर कारवाई झाली असती,” असे विधान त्यांनी केले.

या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टी, राजकारण आणि न्यायालयीन प्रक्रियेचा संगम झाल्याने राज्यभरात या वादाची चर्चा रंगली आहे. आता मानहानीच्या दाव्यावरील न्यायालयीन सुनावणी आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top