भडगावचे नवे पोलिस निरीक्षक महेश टाक यांचा सोनार समाजातर्फे सत्कार; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे उत्साहात स्वागत.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव पोलिस ठाण्यात नुकतेच पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेले महेश टाक यांचा भडगाव सोनार समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व शाल-श्रीफळ प्रदान करत उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी त्यांचे भडगाव नगरीत मनःपूर्वक स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रसंगी भडगाव सोनार समाजाचे अध्यक्ष प्रकाश सोनार, उपाध्यक्ष हेमंत विसपुते, सल्लागार मोहन सोनार, माजी अध्यक्ष व सल्लागार सुरेंद्र मोरे तसेच उद्योगपती शांताराम रणधीर यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक महेश टाक यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, पोलिस निरीक्षक महेश टाक हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे भडगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सोनार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महेश टाक यांचा समाजाला अभिमान असल्याचे सांगत, त्यांच्या नेतृत्वाखाली भडगाव पोलिस प्रशासन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी भडगाव सोनार समाज, सराफ असोसिएशन भडगाव, सोनार समाज कार्यकारिणी तसेच सोनार महिला मंडळाच्या वतीनेही त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
सत्कार समारंभाला समाजातील अनेक पदाधिकारी, सराफ व्यावसायिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





