आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ“एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये” -आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे “दोन थेंब” पाजून उत्साहात करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित पालकांना शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला तरी हा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकाचे वेळेवर लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभागी होऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. पालकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता आपल्या पाल्यांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन त्यांनी केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई मालचे, भडगाव नगरपरिषदेचे आरोग्य सभापती इमरान अली सय्यद, नगरसेवक जितू भाऊ आचारी, डॉ. प्रमोद पाटील, युराज आबा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि अंगणवाडी केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आशा सेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत.
कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. फारूक शेख, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून पोलिओमुक्त भारताचा संकल्प अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.





