‘दोन थेंब जीवनाचे’. भडगावातून आरोग्याचा नवा संकल्प.!!!
प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. भडगाव शहराचे आरोग्य सभापती सय्यद इमरान अली यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सय्यद इमरान अली यांनी सांगितले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळवला असला तरी भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक बालकाचे वेळेवर लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी नियोजन करून घरोघरी जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले.
या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व पात्र बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असून, पालकांनीही आपल्या पाल्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) किंवा अंगणवाडी केंद्रात घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. फारूक शेख, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून, “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





