रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्ये तिप्पट धान्य वाटप.?
नवी दिल्ली :-
देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, एप्रिलमध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्र वितरित करण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे गहू व तांदूळ लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात धान्य मिळणार असून, त्यांना वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जूनपर्यंत लागणारे धान्य आगाऊ स्वरूपात उचलून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्यास सांगण्यात आले होते. यामागे लवकरच होणारी नवीन गहू खरेदी ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन धान्य साठवण्यासाठी गोदामांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी आधीच साठा कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यांनी आगाऊ धान्य उचलून ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले होते.
रेशन कार्डधारकांना सध्या दर महिन्याला मोफत धान्य दिले जाते. मात्र, एप्रिलमध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळणार असल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, हा निर्णय नेमक्या कोणत्या कारणास्तव घेतला, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
एकूणच, या निर्णयामुळे देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळणार असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.




