Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

भडगाव–कजगाव मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांची वाढ; अपघाताचा धोका, कारवाईची मागणी.
भडगाव–कजगाव मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांची वाढ; अपघाताचा धोका, कारवाईची मागणी
कजगाव. भडगाव (प्रतिनिधी) –
भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक सुरू असल्याने भडगाव–कजगाव मार्गावर डंपरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज रात्री अंदाजे 100 ते 150 डंपर वाळू घेऊन भरधाव वेगाने चाळीसगावच्या दिशेने जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असून त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असतानाही संबंधित महसूल व प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही वाहनांवरच कारवाई होत असून बहुतांश डंपर विनाअडथळा मार्गक्रमण करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
भडगाव–कजगाव मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांमुळे दुचाकीस्वार, शेतकरी, विद्यार्थी व पादचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी डंपरांच्या वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पावसाळा व खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वाळू उपशामुळे पर्यावरणीय परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूजल पातळी कमी होणे, नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होणे तसेच भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, नियमित तपासणी मोहीम राबवावी, भरधाव डंपरांवर नियंत्रण आणावे तसेच संबंधित जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.



