चाळीसगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी जेरबंद

53 / 100 SEO Score

चाळीसगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी जेरबंद

 

चाळीसगाव  प्रतिनिधी :-

चाळीसगाव शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत दोन सराईत आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

१४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

सखोल चौकशीदरम्यान राहुल भिसे याने चोरीची HF डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, चाळीसगाव) याला अवघ्या २० हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत राजपूत यालाही ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली. या दोघांकडून एकूण सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात विनानंबर प्लेटच्या दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणारा प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) आढळून आला. चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती न दिल्याने त्याच्या ताब्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली.

पोलीस पथकाचे कौतुक

ही उल्लेखनीय कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आणि भूषण पाटील यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!