Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

मागण्यांसाठी MH-54 भडगाव आरटीओ कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर
मागण्यांसाठी MH-54 भडगाव आरटीओ कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर
जिल्हा प्रतिनिधी : जावेद शेख
भडगाव, दि. १६ जून : महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत MH-54 भडगाव उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.
भडगाव आरटीओ कार्यालयातील कर्मचारी निलेश विजयसिंग परदेशी, एस. एस. मराठे, कांतीलाल तात्याबा अहिरे व संदीप पाटील यांनी या संपात सहभाग नोंदवून कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी पदांच्या पदोन्नती प्रस्तावांना मंजुरी देणे, कार्यालय अधीक्षक पदासाठी सेवाप्रवेश नियम तातडीने तयार करणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी सेवाप्रवेश नियम निश्चित करणे, वर्ग-३ संवर्गातील पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, लिपिक-टंकलेखक व वरिष्ठ लिपिक पदांचे पदनाम बदलणे, आपत्कालीन प्रगती योजनेचे प्रलंबित लाभ देणे तसेच लघुलेखक व इतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंबंधी प्रश्न निकाली काढणे यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून वारंवार निवेदने देऊनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या संपाचा परिणाम नागरिकांवरही होण्याची शक्यता आहे. वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन परवाने, कर भरणा तसेच इतर कार्यालयीन सेवांवर परिणाम होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत विचार केला जाईल. मात्र, तोपर्यंत राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच राहणार आहे.



