कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
अमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी :-
कजगाव (ता. भडगाव) : कनाशी रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारात रविवारी (ता. ३) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीने परिसरात मोठी खळबळ उडाली. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत उंचच उंच ज्वाळा उसळल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या भीषण आगीत शेतकरी सचिन पाटील यांचे सुमारे चार बिघे मका, चार बिघे शाळू पीक आणि अडीच एकर मोसंबी बाग पूर्णतः जळून खाक झाली. तसेच रत्नाबाई पाटील यांचा तेरा एकरांवरील बांबू नष्ट झाला. याशिवाय स्वप्निल पाटील व राकेश पाटील यांचा तेरा एकर बांबू, शेततळे, ठिबक सिंचन व्यवस्था आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेत बापू भोई यांच्या शेतातील ठिबक सिंचन व पाइपलाइन जळून नष्ट झाली, तर रमेश वाणी यांच्या शेतातील ठिबक सिंचन, गुरांचा चारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्यही आगीत भस्मसात झाले. या आगीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.
आगीचे भीषण स्वरूप पाहता स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र, या प्रक्रियेत मोठे नुकसान टाळता आले नाही.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात आगीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.





