खेडगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांमार्फत एक हात मदतीचा कार्यक्रम संपन्न
भडगाव प्रतिनिधी :-
माध्यमिक विद्यालय खेडगाव शाळेत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र येऊन संवेदनशीलतेचे एक आदर्श उदाहरण घालून देत *”एक हात मदतीचा”* हा अभिनव उपक्रम मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यालयात राबवला .सर्व विद्यार्थ्यांना पूरग्रस्त कुटुंबीयांची घरे व झोपडीतील सर्व साहित्य व धनधान्य वाहून गेल्याने आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांची चूल पेटावी व दोन घास पोटात पडावे यासाठी धान्य स्वरूपात मदत करण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर यांचेमार्फत करण्यात आले. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.गहू ,तांदूळ, ज्वारी व बाजरी इत्यादी धान्य जमा झाले.शिक्षकांनी सुद्धा आपले योगदान दिले .सर्व जमा झालेले धान्य योग्य त्या प्रमाणात मोजमाप करून त्यांची पॅकिंग करण्यात आली व पूरग्रस्त कुटुंबांची यादी करून संबंधित लोकांना आज रोजी शाळेत आमंत्रित करून एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून खेडी व खेडगाव गावचे प्रथम नागरिक, आबासाहेब रावते, उषाताई मरसाळे तसेच ज्येष्ठ नागरिक एम जे दादा चौधरी सामाजिक कार्यकर्ते विनायकराव मरसाळे यांना आमंत्रित करण्यात आले.सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.





