बांबरुड प्र. ब. शिवारात मोसंबी बागेत पावसाचे पाणी साचल्याने मोठे नुकसान; शेतकऱ्याची मदतीची मागणी
भडगाव प्रतिनिधी :-
सततच्या मुसळधार पावसामुळे भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. येथील इंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या गट क्रमांक १५०/१ मधील सुमारे साडेतीन एकर क्षेत्रातील मोसंबी बागेत मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने बागेला गंभीर फटका बसला आहे.
शेतात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोसंबीच्या झाडांच्या मुळांना धोका निर्माण झाला असून, झाडांवरील फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करावी, पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करावा तसेच शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी इंद्रसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील बागायती पिकांनाही फटका बसत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





