भडगाव तालुक्यातील नालबंदी येथे अचानक पूर; शिक्षक इम्तियाज खान यांची थरारक सुटका, ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील नालबंदी येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील के.टी. वेअर (K.T. Weir) आणि परिसरातील नाल्यांना आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुराचे पाणी वेगाने वाढून शाळेच्या परिसरात शिरले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचलेले शिक्षक इम्तियाज खान अध्यापनाच्या तयारीत असतानाच काही मिनिटांत पुराचे पाणी शाळेत घुसले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, शाळेबाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शाळेच्या गच्चीवर आश्रय घेतला.
घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता स्थानिक नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत सुरक्षित पद्धतीने शिक्षक इम्तियाज खान यांना गच्चीवरून खाली आणून सुखरूप बाहेर काढले. या धाडसी बचाव मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या बचावकार्यात मा. सरपंच शेख रफियोद्दीन शेख मुनीर, भगवान निकुम, समीर शेख, माजहर शेख, प्रकाश ठाकरे तसेच पोलिस पाटील सुदाम मोरसिंग यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे नालबंदी गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुराच्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे गावाजवळील के.टी. वेअर आणि नाल्यांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, पूरस्थितीचा इशारा देणारी यंत्रणा उभारावी आणि पावसाळ्यात विशेष सतर्कता ठेवावी, अशी मागणी केली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





