धुळे पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; जामडे (निजामपूर) येथे ‘ऑपरेशन जामडे व्हिलेज’ यशस्वी, २५ संशयित ताब्यात
धुळे प्रतिनिधी :-
धुळे जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात मोठी धडक कारवाई करत ‘ऑपरेशन जामडे व्हिलेज’ अंतर्गत जामडे (निजामपूर) येथे २९ जुलैच्या मध्यरात्री २.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग व सर्च ऑपरेशन राबविले. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत २५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जामडे (निजामपूर) परिसरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, अवैध शस्त्रांचा वापर तसेच चोरीचा माल सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, निजामपूर, मोहाडी, शिंदखेडा, पिंपळनेर, नाशिक रोड पोलीस ठाणे तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही व्यापक शोधमोहीम राबविली.
या विशेष कारवाईत १७ पोलीस अधिकारी व १९० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. संशयितांची कसून चौकशी, घरांची झडती, वाहनांची पडताळणी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
रोख रक्कम: ₹९७,७००
चांदी: ४.८० किलो
मोबाईल: १८
लॅपटॉप: २
दुचाकी वाहने: ४३
चारचाकी वाहने: २
आरोपी: २ (महिला आरोपींसह) ताब्यात
एकूण संशयित ताब्यात: २५
धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा गुन्हेगारीची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.





