IMG 20260526 WA1427

“महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर यांनी सादर केलेला “महाकवी दुःखाचा” हा कवी ग्रेस यांच्या कविता आणि आठवणींवर आधारित दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम नुकताच श्रीराम व्यायामशाळा संस्था येथे उत्साहात संपन्न झाला. अभ्यासपूर्ण विवेचन, संवेदनशील मांडणी आणि आत्मीय सादरीकरणामुळे हा कार्यक्रम रसिकांसाठी अविस्मरणीय साहित्यिक अनुभव ठरला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, नरेंद्र पाठक, मिलिंद बल्लाळ यांच्यासह नितीन केळकर, संदेश ढगे, कांताराम सोनावणे, सुधीर चित्ते, मंगेश सातपुते, रामदास खरे, अंजुशा पाटील, जनार्दन म्हात्रे, कल्पना पाटकर, विद्या बनसोडे, विकास भावे, साधना ठाकूर, संध्या लगड, निकिता भागवत, शिवानी गोखले, श्रीनिवास नार्वेकर तसेच विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतीश सोळांकूरकर यांनी कवी ग्रेस यांच्या कवितांमधील सूचकता, प्रतिमासृष्टी, रूपके आणि गर्भित अर्थ ओघवत्या व विद्वत्तापूर्ण शैलीत उलगडून सांगितले. त्यांच्या विवेचनामुळे ग्रेस यांच्या कविता केवळ ऐकण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर नव्या संवेदनांसह अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. कवितेच्या आशयविश्वात प्रवेश करण्यासाठी संवेदनशीलतेचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या त्या सतीश सोळांकूरकर यांनी सांगितलेल्या ग्रेस यांच्या आठवणी. बाह्यतः अलिप्त आणि कठोर भासणाऱ्या व्यक्तिमत्त्वामागील प्रेमळ, संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा माणूस त्यांनी हृदयस्पर्शी शैलीत उभा केला. जगदीश खेबुडकर यांच्याविषयीचा प्रसंग विशेष भावला. एका महाकवीची दुसऱ्या कवीप्रती असलेली नम्रता आणि आदरभाव यामुळे रसिकांच्या मनावर ठसा उमटला.

प्रा. अशोक बागवे यांनी आपल्या मनोगतातून ग्रेस यांच्या कवितेकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. निकिता भागवत यांनी सादर केलेले ‘भय इथले संपत नाही’ हे गीत कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण ठरले. भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण काव्यमय झाले.

ग्रेस यांच्या कविता, आठवणी आणि संवेदनांच्या विश्वाचा वेध घेणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांना समृद्ध साहित्यिक अनुभव दिला. साहित्य भारती, ठाणे यांच्या या उपक्रमाचे रसिकांसह साहित्यवर्तुळातून विशेष कौतुक होत असून, कार्यक्रमाची चर्चा अद्यापही साहित्यप्रेमींमध्ये रंगताना दिसत आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top