मुलाला वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.धाडसी तरुणाने दोन जणांना दिले जीवदान; पुन्हा नदीत उतरताच दुर्दैवी घटना

भडगाव परिसरात शोककळा; अवैध वाळू उपशामुळे खोल खड्ड्यांचा नागरिकांचा आरोप

भडगाव, प्रतिनिधी : शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात रविवारी सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उडी घेणाऱ्या तरुणाने दोन जणांचे प्राण वाचवले; मात्र दुसऱ्यांदा नदीत उतरताच त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जियान आसिफ शेख (वय ८) हा मुलगा गिरणा नदीत खेळत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी त्याची आत्या शगुफ्ता जब्बार शेख (वय ३५) यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. दरम्यान, परिसरात उपस्थित असलेल्या काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हिने देखील धाडस दाखवत नदीत उडी घेत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यांमुळे तिघेही पाण्यात अडकले आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली. त्या वेळी नदीकिनारी उपस्थित असलेल्या नदीम खान नसीम खान (वय २७) यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही पर्वा न करता नदीत उडी घेतली. त्यांनी जीवाची बाजी लावत मोठ्या प्रयत्नांनी जियान आसिफ शेख आणि शगुफ्ता जब्बार शेख यांना सुरक्षित बाहेर काढले.

मात्र काफिया शरीफ पिंजारी अजूनही पाण्यात अडकलेली असल्याचे लक्षात येताच नदीम खान यांनी पुन्हा नदीत उतरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीपात्रातील खोल पाण्यामुळे आणि जोरदार प्रवाहामुळे दोघेही पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने नदीम खान नसीम खान व काफिया शरीफ पिंजारी या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. काही वेळातच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्रशासनाची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी भडगाव शहर तलाठी अविनाश जंजाडे टोणगाव तलाठी प्रशांत कुंभारे,पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे व इकबाल शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने घटनेची माहिती घेत पुढील कार्यवाही सुरू केली.

लोकप्रतिनिधींकडून सांत्वन

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक इमरान अली सय्यद आणि आसिम भाऊ मिर्झा यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना देत मदतकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले. तसेच नगरसेवक आसिम भाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

दरम्यान,नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून कर्मचारी पाठवून नदीत शोधमोहीम राबवली. पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा तसेच आरोग्य विभागाचे लिपिक छोटे वैद्य व अजय कंडारे यांनी मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.

आमदारांची भेट

घटनेची माहिती मिळताच भडगाव–पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, सय्यद इमरान अली व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी आमदारांकडे केली.

अवैध वाळू उपशामुळे दुर्घटना.?

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते गिरणा नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून त्यामध्ये पाणी साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या खोल खड्ड्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांनी प्राण गमावल्याने भडगाव शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Share