कजगावातून घरासमोर उभी असलेली मोटारसायकल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी:-
कजगाव येथील रहिवासी जयप्रकाश भास्कर अमृतकर यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर (क्रमांक MH 19 EE 2205) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. १ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात वाहनचोरीबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयप्रकाश अमृतकर यांनी आपली मोटारसायकल नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. काही वेळाने बाहेर येऊन पाहिले असता मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोधाशोध करूनही वाहनाचा कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी तात्काळ भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सदर हिरो स्प्लेंडर (MH 19 EE 2205) या मोटारसायकलबाबत अथवा संशयास्पद हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने भडगाव पोलीस ठाण्याशी किंवा मोटारसायकल मालक जयप्रकाश भास्कर अमृतकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





