संततधार पावसामुळे कजगाव परिसर जलमय; खरीप पिकांना धोका
भडगाव ता प्रतिनिधी आमीन पिंजारी
कजगाव, ता. भडगाव : तालुक्यातील कजगाव परिसरात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती शिवारासह अनेक भाग जलमय झाले आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
शेतामध्ये पाणी साचल्याने कपाशी, मका, केळी आणि बाजरी या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, पाऊस आणखी काही दिवस कायम राहिल्यास नुकसानीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





