कापडणेत ५ MVA विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण; धुळे ग्रामीणच्या वीज समस्येला मोठा दिलासा
धुळे प्रतिनिधी :-
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कापडणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ५ MVA क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपकेंद्रामुळे कापडणेसह धनूर, लोणकुटे, तामसवाडी, हेंकळवाडी, कौठळ आणि न्याहळोद परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, दर्जेदार आणि अखंडित होण्यास मदत होणार आहे. कापडणे हे धुळे तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येते.
नवीन उपकेंद्रामुळे कमी दाब, वारंवार होणारे वीज खंडित होणे आणि तांत्रिक अडचणींमध्ये मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. याचा थेट लाभ शेतकरी, उद्योग, लघुउद्योग तसेच घरगुती वीज ग्राहकांना होणार असून कृषी क्षेत्रालाही विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, कार्यकारी अभियंता जे. व्ही. महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. एफ. पवार, उपअभियंता आशिष काकडे, अभियंता हेमंत कोठीले, महेंद्र चव्हाण, प्रवीण भामरे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार राघवेंद्र (रामदादा) पाटील यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धुळे ग्रामीण मतदारसंघातील वीजविषयक प्रश्न टप्प्याटप्प्याने निकाली काढले जात असून, नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”





