नगरदेवळा येथे ‘SIR’ जनजागृती मोहीम: तरुणांचा अभूतपूर्व आणि कौतुकास्पद पुढाकार!
नगरदेवळा वार्ताहर
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या ‘SIR’ मोहिमेचे काम अत्यंत वेगाने आणि उत्साहात सुरू आहे. शासनातर्फे नियुक्त केलेले बी.एल.ओ. (BLO) कर्मचारी घरोघरी जाऊन फॉर्म भरण्याचे कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र, कामाचा प्रचंड ताण आणि ३१ जुलैची अंतिम मुदत (डेडलाईन) यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे कामाचा वेग मंदावत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील काम अवघ्या एका महिन्यात पूर्ण करणे जवळपास अशक्य वाटत होते.
या कठीण प्रसंगी, नगरदेवळा येथील काही सुजाण आणि निष्ठावान तरुणांनी हे आव्हान स्वीकारत समाजसेवेचा विडा उचलला आहे. या तरुणांनी आपले वैयक्तिक काम आणि व्यवसाय बाजूला ठेवून, घरोघरी जात नागरिकांमध्ये ‘SIR’ मोहिमेबाबत जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
या स्तुत्य सामाजिक मोहिमेला जामा मशिदीचे अध्यक्ष आदरणीय नूर बेग साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे. या कार्यात शेख अफरोज रहीम, वसीम पटवे, मुश्ताक ताज खान, सय्यद इमरान अली आणि वसीम गुलाम मोहम्मद हे उत्साही तरुण अग्रभागी राहून आपली मोलाची सेवा देत आहेत.
स्थानिक नागरिकांकडून या तरुणांच्या निस्वार्थी भावनेचे आणि या उत्कृष्ट कार्याचे भरभरून कौतुक होत आहे. ईश्वर या तरुणांच्या संकल्पांना यश देवो, त्यांना सुख-समृद्धी लाभो आणि त्यांच्यातील समाजसेवेची ही भावना अशीच निरंतर कायम राहो, हीच सदिच्छा!





