मोहरम सणानिमित्त भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
मोहरम सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे मोहरमच्या १०व्या दिवशी आयोजित करण्यात येणारा भव्य सत्कार सोहळा यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मोहरम पंच कमिटीचे शेर खान अमानुल्ला खान, सरवर बेग मिर्झा, नकीब दादा, तसलीम शेख, तसेच भडगावचे पोलिस निरीक्षक टाक साहेब, भडगावचे प्रथम नागरिक प्रदीप (जाहगीर) मालचे, भडगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक विजुकुमार देशमुख, विजू भोसले, अतुल परदेशी, अलीम शाह, तसेच पत्रकार अबरार मिर्झा व जमाल कासार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोसेफ मरसाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन इसहाक मलिक यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोहरमचा संदेश हा शांतता, बंधुता, त्याग आणि सामाजिक ऐक्याचा असल्याचे सांगत समाजात सलोखा व एकोपा कायम राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध समाजातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर उपस्थितांनी मान्यवरांचे अभिनंदन करून मोहरम सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.





