दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणारे आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात.!!!

53 / 100 SEO Score

दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणारे आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात.!!!

 

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरातील लक्ष्मी आंगन कॉलनी परिसरात दिवसा ढवळ्या घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत गुन्ह्याची उकल केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पाचोरा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजेच्या सुमारास सातगाव डोंगरी येथील मूळ रहिवासी व सध्या पाचोरा येथील लक्ष्मी आंगन कॉलनीत राहणाऱ्या सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२) यांच्या घरी आरोपींनी अमेझॉनचे पार्सल आल्याचे सांगून प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलांना एका ठिकाणी बसवून बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या चिपांची मागणी केली. त्यानंतर घरातील कपाटांची झडती घेत सात हजार रुपये रोख रक्कम तसेच मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये घेऊन आरोपी पसार झाले.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार पाचोरा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतंकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) याचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. सातपूर, नाशिक) याच्याकडून चोरीतील ७,७०० रुपये व गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली पिस्तूल जप्त करण्यात आले.

तपासात असेही समोर आले की, फिर्यादींच्या घरी सोन्याच्या चिपा असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोकुळ वाघ याने आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरीचा कट रचला होता. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!