कनाशी–कजगाव रस्त्यावर गौण खनिज माफियांचा धुमाकूळ!,दिवसा ढवळ्या जेसीबीने उत्खनन; ट्रॅक्टरद्वारे सर्रास वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय?

कनाशी–कजगाव रस्त्यावर गौण खनिज माफियांचा धुमाकूळ!,दिवसा ढवळ्या जेसीबीने उत्खनन; ट्रॅक्टरद्वारे सर्रास वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय?

 

भडगाव, प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरातील कनाशी–कजगाव रस्त्यालगत गौण खनिजाच्या बेकायदेशीर उत्खनन व वाहतुकीचा प्रकार खुलेआम सुरू असून संबंधित प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवसा ढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन केले जात असून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूकही सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेसमोर घडत असतानाही महसूल विभाग अथवा संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अवैध व्यवसायाला प्रशासनाचे अप्रत्यक्ष अभय मिळत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात लोणपुऱ्याचे येथील तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता, “या प्रकरणाची आम्हाला कोणतीही माहिती नाही. तसेच कोणालाही गौण खनिज उत्खनन अथवा वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेले उत्खनन आणि वाहतूक पाहता प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तसेच पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

ठळक प्रश्न :

– परवाना नाही, माहिती नाही; मग उत्खनन आणि वाहतूक सुरू कशी?

– गौण खनिज तस्करीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

– महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला संरक्षण कुणाचे?

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!