महागड्या उपचारांचा खर्च होणार शून्य; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.?
नवी दिल्ली :-
देशातील गरीब, वंचित तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार सहन करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) ही देशातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ शासकीय रुग्णालयांपुरता मर्यादित नसून अनेक खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.
खासगी रुग्णालयात उपचारासाठी ही अट महत्त्वाची
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित खासगी रुग्णालय हे योजनेच्या अधिकृत पॅनेलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सरकारने देशभरातील हजारो शासकीय व खासगी रुग्णालयांना या योजनेशी जोडले आहे. रुग्णाने उपचारासाठी जाण्यापूर्वी संबंधित रुग्णालय योजनेत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
रुग्णालयाची माहिती कशी तपासाल?
लाभार्थी नागरिक अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Find Hospital” या पर्यायाद्वारे राज्य, जिल्हा आणि आजाराची माहिती भरून संबंधित रुग्णालयांची यादी पाहू शकतात. यामुळे उपचारासाठी योग्य रुग्णालय निवडणे सोपे होते.
कोणत्या उपचारांचा समावेश.?
आयुष्मान भारत योजनेत १५०० हून अधिक वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, न्यूरो सर्जरी, हाडांचे आजार, अपघातातील गंभीर दुखापती, गुडघा प्रत्यारोपण, नवजात शिशू उपचार तसेच इतर अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया खर्च, डॉक्टरांची फी, औषधे, आयसीयू शुल्क, रक्त तपासणी, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या विविध चाचण्या आणि उपचारांचा खर्च योजनेतून केला जातो.
OPD सेवांसाठी लाभ नाही
अनेक नागरिकांमध्ये आयुष्मान कार्डबाबत गैरसमज आढळून येतो. फक्त डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा ओपीडी तपासणीसाठी या योजनेचा लाभ मिळत नाही. रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतरच योजनेअंतर्गत सुविधा लागू होतात.
रुग्णालयाने नकार दिल्यास तक्रार करा
काही ठिकाणी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जाते किंवा आयुष्मान कार्ड स्वीकारण्यास नकार दिला जातो. अशा वेळी नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी. यासाठी 14555 किंवा 104 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येतो. तसेच रुग्णालयातील आयुष्मान मित्र यांच्याकडूनही मदत मिळू शकते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाची चौकशी केली जाते.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लाभ
केंद्र सरकारने अलीकडेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही योजनेचा विस्तार केला आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य उपचारासाठी मोठा आधार मिळणार आहे. पात्रता तपासण्यासाठी अधिकृत पोर्टलवरील “Am I Eligible” पर्यायाचा वापर करून मोबाईल क्रमांक व रेशन कार्ड क्रमांकाद्वारे पडताळणी करता येते.
आरोग्य सुरक्षेचे प्रभावी कवच
देशातील लाखो कुटुंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही केवळ आरोग्य योजना नसून आर्थिक संकटापासून वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच ठरत आहे. विशेषतः गंभीर आजारांवरील लाखो रुपयांचा खर्च टाळण्यासाठी ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा आधार बनली आहे.





