भडगाव येथे काँग्रेसचा बैलगाडा मोर्चा; पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी.!!!
भडगाव, प्रतिनिधी :-
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी भडगाव येथे भव्य बैलगाडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव ऊर्फ गुलाबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस प्रदेश सचिव आशुतोष पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. पाचोरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोहर महाले यांनी या आंदोलनाचे नियोजन केले.
बैलगाडा मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहतूक क्षेत्रावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे आठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या जनतेसाठी ही दरवाढ आणखी आर्थिक संकट निर्माण करणारी ठरत आहे. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, वाहतूक, शेती आणि इतर सेवा क्षेत्रांवरील खर्च वाढून महागाईला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलकांनी पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कमी करून इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवावा तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. अनेक ठिकाणी इंधनटंचाईमुळे शेतीची कामे खोळंबत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
मोर्चात युवक काँग्रेस प्रदेश सचिव आशुतोष पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल माळी, मनोहर महाले, धनंजय शिंदे, गोविंद देशमुख, याकूब पठाण, दिलीप शेंडे, भाऊसाहेब पाटील, जयंतीलाल परदेशी, गोकुळ शिंदे, बापू पाटील, सय्यद कमर अली, महेश शिंदे, विनोद नेरपगार, विशाल सोनवणे, अर्जुन शिंदे, कलीम बेग, तोफिक मण्यार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चानंतर प्रशासनामार्फत शासनाकडे निवेदन पाठवून इंधन दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

