IMG 20260531 WA1202

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा कलाकाव्य संध्या’ आणि ‘यशवंत पुरस्कार वितरण सोहळा’ ३० मे २०२६ रोजी भारतीय विचार साधना, सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध भागांतून सहभागी झालेल्या कवी-साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास प्रमुख आतिथी म्हणून तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेड) उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून जयमाला इनामदार, रजनी भट, राजश्री आठवले, अंजली पटवर्धन, सतीश इंदापूरकर आणि तितिक्षा यशवंत पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वाळुंजकर सहभागी झाले होते.

तृप्ती देसाई यांनी साहित्य आणि सामाजिक जाणीव यांच्यातील नाते अधोरेखित केले. जयमाला इनामदार यांनी नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली. सतीश इंदापूरकर यांनी कविता आणि साहित्य हे समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

तितिक्षा यशवंत पुरस्कार सुहास वाळुंजकर यांनी आपल्या अर्धांगिनी अपर्णा वाळुंजकर यांच्यासह पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी आजवरच्या कार्यकाळातील अनेक सुवर्णक्षणांना उजाळा देत आयोजकांप्रती अपार कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात कलाकाव्य संध्येअंतर्गत विविध कवींनी कविता सादर केल्या. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ३० सारस्वतांना प्राधान्य देण्यात आले होते. यात प्रामुख्याने विजय यशवंत सातपुते, प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख, रवींद्र गाडगीळ, विलास बाबर, चंद्रकांत जोगदंड, बाबा ठाकूर, अश्विनी पिंपळे, सुधीर कुलकर्णी, दिपराणी गोसावी, ॲड. संध्या देशपांडे, वैशाली अविनाश वर्तक, नंदकिशोर गावडे, संजय वसंत माने आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनीही सहभाग नोंदवला.

कार्यक्रमासाठी भालचंद्र शिर्के आणि गौरव पुंडे यांचे विशेष सहाय्य लाभले. विजय सातपुते आणि प्रिया प्रमोद दामले यांनी सूत्रसंचालन केले. एम्. अजया आणि अजिता अजित मुळीक यांनी निमंत्रक म्हणून कार्यक्रमाचे संयोजन केले. सुसूत्र आयोजन आणि साहित्यप्रेमींच्या प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top