पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – मुख्याधिकारी मंगेश देवरे

पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – मुख्याधिकारी मंगेश देवरे

पाचोरा, प्रतिनिधी :-

“पाचोरा शहराचा मजबूत, सुशोभित आणि सर्वसमावेशक विकास हीच माझ्या पुढील वाढदिवसाची खरी भेट असेल,” असे भावनिक प्रतिपादन पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात केले. शहराच्या विकासासाठी प्रशासनासोबत नागरिकांचेही सक्रिय सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

मुख्याधिकारी देवरे म्हणाले की, पाचोरा शहर विकासाच्या मार्गावर निश्चितपणे पुढे जात आहे. मात्र, शहराला अद्याप अनेक क्षेत्रांत प्रगतीची उंच शिखरे गाठायची आहेत. शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यातही प्रशासनाला अशीच साथ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शहरात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगारनिर्मिती, नशाबंदी, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध विषयांवर नगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, विकासकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या शहरात जनगणनेचे काम अत्यंत नियोजनबद्ध आणि सुव्यवस्थित पद्धतीने सुरू असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रगणकांना आर. ओ. तात्या व्यापारी भवन येथे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांनी स्वतःची स्व-गणना देखील पूर्ण केली आहे. प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेत्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्व-गणना करून राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

१६ मेपासून प्रगणक आपल्या-आपल्या विभागात घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम करत आहेत. तसेच ३० जूनपासून शहरात SIR संदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचीही माहिती दिली. शहरात नाले तुंबणे, पाणी साचणे किंवा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळापूर्व स्वच्छता व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांतील नाल्यांची साफसफाई, रस्ते दुरुस्ती आणि जलनिस्सारण व्यवस्थेची तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पाचोरा शहराच्या विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा स्मिता पाटील, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

दरम्यान, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवसेना जिल्हा संघटक विजय ठाकूर, दिलीप महाजन, शिक्षक सेना अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद रहीम, ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष विकास पाटील, सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *