राजपूत परदेशी समाजातील गुणवंतांनी राज्यस्तरीय “महाराणा प्रताप सन्मान पुरस्कार” साठी नाव नोंदणीचे आवाहन

राजपूत परदेशी समाजातील गुणवंतांनी राज्यस्तरीय “महाराणा प्रताप सन्मान पुरस्कार” साठी नाव नोंदणीचे आवाहन

भडगाव प्रतिनिधी :-

राजपूत, परदेशी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींनी राज्यस्तरीय “महाराणा प्रताप सन्मान पुरस्कार” साठी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन शिवराणा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा भव्य सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

शिवराणा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीस प्रारंभ झाला असून अवघ्या चार दिवसांत शंभराहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींची नोंदणी प्राप्त झाली आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दरवर्षी सहभागींची संख्या वाढत असल्याचे आयोजकांनी सांगितले

परभणी, नाशिक, जळगाव, धरणगाव, अमरावती, खामगाव, बुलढाणा तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत असल्याची माहिती देण्यात आली.

दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करावी. तसेच एमपीएससी राज्यसेवा, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन आयोग, विविध पदवी अभ्यासक्रम बीए, बीकॉम, बीएससी, एमबीबीएस पदवीधारक, विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, खेळाडू, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रमाणपत्रधारकांनी आपली माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुस्ती स्पर्धेत विशेष यश संपादन करणारे खेळाडू तसेच सामाजिक क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे व वृत्तपत्र कात्रणांसह प्रस्ताव सादर करावेत. अंतिम निर्णय समितीमार्फत घेतला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा “समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येणार असून समाजातील गुणवंतांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी एल. डी. ताटू (अध्यक्ष), भोरासिंग राजपूत, आनंद बारवाल, अंजली कोकुल्डे, रंजितसिंग डेडवाल, प्रा. सुनील शिहरे, धरमसिंग निमरोट, दिलीपसिंग राजपूत, सुनील राजपूत, कैलास जोनवाल आदी कार्यकर्ते नावनोंदणी प्रक्रिया राबवत आहेत.

ही माहिती भडगाव तालुका पत्रकार तथा परदेशी-राजपूत समाजाचे तालुकाध्यक्ष अशोकबापू परदेशी यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *