IMG 20260519 WA1152

कजगाव–पारोळा रस्त्यावर ठेकेदाराचा हलगर्जीपणा; खडीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून युवक गंभीर जखमी

कजगाव–पारोळा रस्त्यावर ठेकेदाराचा हलगर्जीपणा; खडीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून युवक गंभीर जखमी

सूचना फलक नाहीत, सुरक्षा उपाय नाहीत; नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळIMG 20260519 WA1154

भडगाव ता प्रतिनिधी : आमीन पिंजारी,

कजगाव–पारोळा रस्त्यावरील सुरू असलेल्या रस्ते कामातील गंभीर निष्काळजीपणामुळे आणखी एक भीषण अपघात घडला असून, मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास चेतन वाणी हा युवक गंभीर जखमी झाला. रस्त्यावर विनासूचना टाकण्यात आलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन वाणी हे गोंडगावहून कजगावकडे मोटरसायकलने जात असताना अंधारात रस्त्यावरील खडीचा ढिगारा न दिसल्याने त्यांची दुचाकी थेट ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की युवक गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, कजगाव–पारोळा रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असले तरी ठेकेदार व संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, परावर्तक चिन्हे, सुरक्षा बॅरिकेड्स किंवा प्रकाशव्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील अडथळे दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही या मार्गावर अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडले असूनही प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे “अपघात होऊन नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“रस्ता कामाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवून काम केले जात आहे. संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी तीव्र मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावर त्वरित सूचना फलक, बॅरिकेड्स आणि प्रकाशव्यवस्था उभारावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

 

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top