Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

साखरपुड्यासाठी आले आणि निकाह लावून गेले; भडगावातील आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा.!!!
साखरपुड्यासाठी आले आणि निकाह लावून गेले; भडगावातील आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरात बुधवार दिनांक १३मे रोजी एक आगळावेगळा आणि समाजासाठी प्रेरणादायी निकाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे वधू-वर पक्षातील नातेवाईक आणि पाहुणे हे केवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते; मात्र दोन्ही परिवारांनी समाजासमोर आदर्श निर्माण करत साखरपुड्याच्याच कार्यक्रमात साध्या पद्धतीने निकाह संपन्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या विवाह सोहळ्याची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
सय्यद सादिक अली महमूद अली यांची(नाथ) पौत्री तथा सय्यद मुबीन अली यांची सुपुत्री चि. सौ. का. सय्यद मुस्कान हिचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमळनेर येथील पठाण असलम खान यांचे सुपुत्र चि. फहीम खान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन्ही परिवारांनी परस्पर संमतीने निकाहही त्याच ठिकाणी आणि अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय घेतला.
आजच्या काळात विवाह समारंभात मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च, दिखावा आणि अनावश्यक स्पर्धा वाढत असताना या दोन्ही परिवारांनी घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. कोणताही गाजावाजा, डीजे, मिरवणूक किंवा अवाजवी खर्च न करता अत्यंत साधेपणाने निकाह पार पडल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
हा आदर्श निकाह यशस्वी होण्यासाठी नगरसेवक आसीम भाऊ मिर्झा (भडगाव), सैयद साबिर अली आसिफ पठाण ,तसेच पाचोरा येथील समाजसेवक अजहर खान साहेब, मौलाना जहूर खान साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच मिर्झा नाजीम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा अत्यंत शांत आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
समाजात वाढत्या लग्नखर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण होत असताना अशा प्रकारचे साधे आणि आदर्श विवाह समाजाला नवी दिशा देणारे असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. “निकाह हा इस्लाममध्ये साधेपणाने करण्यावर भर दिला जातो. त्या परंपरेचे पालन करत या दोन परिवारांनी समाजासमोर एक सकारात्मक संदेश दिला आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली.
भडगावातील या आदर्श निकाहाची सध्या शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून सामाजिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.



