रस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका
भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
भडगाव (ता. भडगाव) : कजगाव येथील गट क्रमांक 127/1/A, शंकर नगर परिसरातील कॉलनी रस्त्यालगत असलेली कठडाविना उघडी विहीर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सदर विहीर रस्त्याच्या अगदी कडेला असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी ही विहीर गंभीर संकट ठरत आहे.
राज्यात यापूर्वी अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असताना, कजगावमधील ही परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील लहान मुले खेळताना वारंवार विहिरीजवळ जातात. तसेच रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने विहिरीच्या अत्यंत जवळून जात असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून विहिरीभोवती सुरक्षित कठडा उभारावा किंवा विहीर तातडीने बुजवून टाकावी, अशी ठोस मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने विलंब न करता त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.





