कासोदा येथे अक्षय तृतीये निमित्त पारंपरिक बारागाडा ओढण्याचा सोहळा उत्साहात
कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे) :
कासोदा येथे सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आठवडे बाजार परिसरातील जागृत देवस्थान ग्रामदैवत जगदंबा माता मंदिर येथे पारंपरिक “बारागाडा ओढणे” हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
गावातील अखंड परंपरेचे जतन करत ग्रामस्थ व भाविक दरवर्षीप्रमाणे जगदंबा माता मंदिरापासून बारा गाड्या ओढण्याचा सोहळा आयोजित करतात. हा अनोखा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी कासोदा व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
परंपरेनुसार बारागाडा ओढण्याचा मान वारे भगत बाबा यांच्या कुटुंबाकडे होता. मात्र त्यांचे अलीकडे निधन झाल्याने यावर्षी हा मान बापू नस्तनपुरे यांना देण्यात आला. भगतांची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी भगतांनी गावातील विविध मंदिरांमध्ये जाऊन नतमस्तक होत हजेरी लावली.
या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला वर्ग, तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी ग्रामदैवत जगदंबा मातेकडे गावात शांतता, समृद्धी नांदावी तसेच “बळीराजा सुखी होऊ दे आणि पाऊसपाणी चांगले पडू दे” अशी प्रार्थना करण्यात आली.
बारागाड्यांचा हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरतो. लाकडी गाडे आकर्षकरीत्या सजवून एकमेकांना दोरीने बांधले जातात आणि त्यांना एकत्र ओढले जाते. ही परंपरा एकविसाव्या शतकातही तितक्याच श्रद्धा व उत्साहाने जोपासली जात आहे.
दरम्यान, मोठी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी शिस्त राखत उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.














Leave a Reply