Skip to content

भडगाव हादरले! जुन्या पारोळा रोडवर कारमधून १० पुडी एमडी ड्रग्स जप्त; महिलेसह दोघांना अटक

भडगाव हादरले! जुन्या पारोळा रोडवर कारमधून १० पुडी एमडी ड्रग्स जप्त; महिलेसह दोघांना अटक

भडगाव प्रतिनिधी :-

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत सतर्क असलेल्या भडगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई करत जुन्या पारोळा रोडवरून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली असून, भडगाव तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून एक कारद्वारे अमली पदार्थांचा साठा भडगावकडे आणला जात असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ कारवाईची योजना आखली. जुन्या पारोळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून संशयित वाहनाची वाट पाहण्यात आली.

दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास (एमएच ०१ बीबी २२१६) क्रमांकाची संशयास्पद फिएस्टा कार दिसताच पोलिसांनी ती अडवली. कारची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये १० पुड्यांमध्ये ठेवलेले एमडी (मेफेड्रोन) प्रकारातील अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कार जप्त करत त्यातील आरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईत योगेश हरी चौधरी आणि सरगम हरी चौधरी (रा. पारोळा, हल्ली मुक्काम भडगाव) यांना अटक करण्यात आली आहे. महिला आरोपीचा समावेश असल्यामुळे या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनामा, नमुना तपासणी आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, भडगाव तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा अमली पदार्थ तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे इतर ठिकाणीही पोहोचू शकतात.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढीला लक्ष्य करून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत अशा संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

भडगाव पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, पुढील काळात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!