भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी
भडगाव :जावेद शेख
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भडगाव शाखेच्या वतीने नाशिक येथील कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर व त्वरित कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
नाशिकमधील कॅप्टन खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे. सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण आणि बुवाबाजी यांच्या संगनमताचे हे धोकादायक उदाहरण असल्याचेही समितीने स्पष्ट केले.
समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म व ज्योतिषाच्या नावाखाली महिलांसह सर्वसामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारची बुवाबाजी एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ तसेच राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते, असा आरोपही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्यामागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे समितीने अधोरेखित केले आहे. तसेच, या घटनेचा निष्पक्ष व व्यापक तपास करून अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि पीडित महिलांचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे, शाखाध्यक्ष यूनुस खान, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. अतुल देशमुख, प्रा. एल. जी. कांबळे, एस. डी. पाटील, पत्रकार जावेद शेख, फिरोज मनियार, स्वप्निल सोनार, सुभोध पाटील, गोकुळ चौधरी, नागेश वाघ, डॉ. विकास पाटील, जेष्ठ नागरिक अनिल पवार, गुलाबराव जाधव, यशवंत तहसीलदार आदी उपस्थित होते.
