१५ ऑगस्टला भडगावच्या मुख्याधिकाऱ्यांकडून नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवणार?
मूळ ध्वजस्तंभ हटविल्याने प्रश्नचिन्ह; प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
१३ ऑगस्टपासून भावेना पाटील यांचे धरणे आंदोलन
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद कार्यालयातील मूळ राष्ट्रीय ध्वजस्तंभ हटविण्याच्या प्रकरणावरून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मूळ ध्वजस्तंभ कोणत्या आदेशाने हटविण्यात आला? संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली होती का? तसेच नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेला सुमारे ७५ फूट उंच नवीन ध्वजस्तंभ नेमका कोणत्या उद्देशाने उभारण्यात आला, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी भावेना भगवान पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन चौकशी, संबंधित आदेश व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची तसेच मूळ ध्वजस्तंभ पूर्ववत उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, निवेदनाला १५ दिवस उलटूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
७५ फूट ध्वजस्तंभाच्या उद्देशावरही प्रश्न
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३० जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार भडगाव येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा प्रशासकीय दर्जा, त्यासाठी निधी व प्रशासकीय मंजुरी कोणत्या आधारावर मिळाली, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
१५ ऑगस्टपूर्वी प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी
स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असताना नगरपरिषद प्रशासनाने ध्वजस्तंभाच्या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. १५ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवणार? मूळ ध्वजस्तंभ हटविल्यानंतर ७५ फूट ध्वजस्तंभावर ध्वजारोहण होणार की नगरपरिषदेसाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ उभारण्यात येणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
राष्ट्रीय ध्वजाशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने मूळ ध्वजस्तंभ हटविण्याचा आदेश, ७५ फूट ध्वजस्तंभ उभारणीची प्रशासकीय प्रक्रिया, निधी व मंजुरी याबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
१३ ऑगस्टपासून धरणे आंदोलन
प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत भावेना भगवान पाटील यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि १५ ऑगस्टला नगरपरिषद कार्यालयात कोणत्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविला जातो, याकडे भडगावकरांचे लक्ष लागले आहे.





