IMG 20260812 WA1731

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा; पोलिस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

57 / 100 SEO Score

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा; पोलिस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 

धुळे प्रतिनिधी :-

आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्साहात साजरा करण्यासाठी धुळे पोलिस प्रशासनाने गणेश मंडळे, पदाधिकारी, डीजे चालक तसेच नागरिकांना पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. मंडळांनी उत्सवासाठी संबंधित विभागांची आवश्यक पूर्वपरवानगी घेऊनच मंडप उभारावा. मंडप, कमानी अथवा सजावटीमुळे वाहतुकीला तसेच नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या.

डीजे व ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत विशेष सूचना

डीजे व ध्वनिक्षेपकाचा वापर करताना शासनाच्या ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. डीजे चालकांनी त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच वाहनाची माहिती स्पष्टपणे दर्शवावी. ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही आणि निर्धारित ध्वनिपातळीचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी गणेश मंडळांनी घ्यावी.

प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळासाठी एका पोलिस अंमलदाराची नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित अंमलदाराच्या संपर्कात राहून मंडळांनी आवश्यक सहकार्य घ्यावे तसेच समस्या असल्यास त्याबाबत तातडीने पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी, असे सांगण्यात आले.

सीसीटीव्ही व पोलिस मित्रांचा वापर

गणेश मंडळांनी मंडप व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरावर लक्ष ठेवावे. तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिस मित्रांचा योग्य पद्धतीने उपयोग करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

मंडप किंवा स्वागत कमानी उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच अपघाताची शक्यता निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे बंधनकारक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

आक्षेपार्ह देखावे व फलक टाळण्याचे आवाहन

गणेशोत्सवाच्या काळात दोन धर्म अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही आक्षेपार्ह देखावे, फलक अथवा घोषवाक्ये लावू नयेत. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. मिरवणुकीदरम्यान वाहतूक व नागरिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होणार नाही, याचीही मंडळांनी दक्षता घ्यावी.

“गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. सर्व गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे आणि गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत व उत्साहात साजरा करावा,” असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top