दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता उघड; मुख्याध्यापक, अधीक्षक, संस्थाचालक व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपचे अनील वाघ यांची मागणी
भडगाव प्रतिनिधी :-
भाजपचे कार्यकर्ते अनील वाघ यांनी श्री साई समर्थ मतिमंद निवासी विद्यालय, भडगाव येथील विद्यार्थी बेपत्ता प्रकरणासह विविध अनियमिततांबाबत केलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली असून, जिल्हा परिषद जळगावने सादर केलेल्या चौकशी अहवालात अनेक गंभीर त्रुटी आणि नियमभंग उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर तसेच सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव यांनी संयुक्तपणे आयुक्त, दिव्यांग कल्याण व सक्षमीकरण विभाग, पुणे यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार, चौकशीदरम्यान मुख्याध्यापक अनुपस्थित असल्याचे आढळले. शाळेत आवश्यक सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या नोंदी तसेच प्रशासकीय कामकाजात गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अनील वाघ म्हणाले की, “विद्यार्थी खरोखर बेपत्ता आहे की त्याच्यासोबत काही अनुचित घटना घडली आहे, याबाबत अद्याप गंभीर शंका कायम आहे. त्यामुळे केवळ मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई करून हे प्रकरण संपविणे योग्य ठरणार नाही. संपूर्ण संस्थेची निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी होणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यासह संस्थाचालक आणि संचालक यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. निष्पक्ष चौकशीत शासनाची दिशाभूल करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.”
अनील वाघ यांनी संबंधित शाळेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची तसेच दोषी आढळणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षक, संस्थाचालक आणि संचालक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रकरणामुळे शाळेच्या प्रशासनावर तसेच शासनाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.





