रेकॉर्डवरील वाहनचोर जेरबंद; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त.!!!
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जळगाव शहरातील वाहनचोरीचा गुन्हा उघड
जळगाव प्रतिनिधी:-
जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स (क्रमांक MH-19-BT-9433) मोटारसायकल जप्त केली आहे. ही मोटारसायकल जळगाव शहरातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान रेकॉर्डवरील आरोपी विशाल जुगलाल जाधव (रा. सध्या विवरे खुर्द, ता. रावेर, जि. जळगाव) याच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर संबंधित मोटारसायकल जप्त करण्यात आली. पडताळणीत ही मोटारसायकल जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याचा इतर गुन्ह्यांमधील सहभाग तपासला जात आहे.
या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक सोपान कोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस नाईक कॉन्स्टेबल राहुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नंदलाल पाटील करीत आहेत.





