“आता आमची मुलंही मोठी स्वप्नं पाहतील!” भडगावच्या जि.प. उर्दू बॉईज शाळेत शिक्षणाची नवी पहाट,सीबीएसई पॅटर्नच्या ‘पुस्तिकांचे मोफत वाटप; ग्रामीण व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
“शिक्षण हीच खरी संपत्ती आहे आणि प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे,” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवत भडगाव शहरातील जिल्हा परिषद उर्दू बॉईज शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नच्या ‘ शैक्षणिक पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ पुस्तिका वितरणाचा नव्हता, तर ग्रामीण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभा राहिलेला आशेचा दीप ठरला.
आजही अनेक पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्याचे स्वप्न पाहतात; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वप्न अनेकदा अपूर्ण राहते. अशा वेळी जि.प. उर्दू बॉईज शाळेने सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणाची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली करून “दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे,” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
कार्यक्रमाच सूत्रसंचालन मुश्ताक सर यांनी केले. गटविकास अधिकारी अध्यक्षस्थानी रावसाहेब रोहिदास पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेवक तथा आरोग्य सभापती इमरान अली सय्यद, पत्रकार अबरार मिर्झा. यावेळी वर्षा मॅडम, तस्लीम सर, शारिक अब्दुल रज्जाक (केंद्रप्रमुख), खलील सर (माजी केंद्रप्रमुख), मुख्याध्यापक हाजी जाहिद सर, आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मार्गदर्शन करताना इमरान अली सय्यद यांनी पालकांना, विशेषतः मातांना, मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “दररोज थोडा वेळ मुलांच्या अभ्यासासाठी दिल्यास त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. शाळा आणि पालक एकत्र आले, तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही,” असे ते म्हणाले.
या उपक्रमामागील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे लुकमान सिद्दीकी सर यांनी कोणत्याही सरकारी अनुदानाची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून हैदराबाद येथून सीबीएसई पॅटर्नच्या ‘आनंद’ पुस्तिका मागवून विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या. शिक्षणासाठी केलेल्या त्यांच्या या निःस्वार्थ योगदानाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तिका पडताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील अभिमान हे दृश्य उपस्थितांना भावूक करून गेले. अनेक पालकांनी भावना व्यक्त करत सांगितले, “आता आमच्या मुलांनाही मोठी स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.”
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, वाचनाची आवड आणि आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याचा संदेश दिला. सीबीएसई पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठीची तयारी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम केवळ पुस्तिका वाटपापुरता मर्यादित नसून ग्रामीण आणि अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याच्या सामाजिक परिवर्तनाचा पाया असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
“जेव्हा एका मुलाच्या हातात दर्जेदार पुस्तक येते, तेव्हा त्याच्या हातात केवळ ज्ञानच नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची किल्ली येते. भडगावच्या जि.प. उर्दू बॉईज शाळेने आज अनेक घरांमध्ये आशेचा दिवा प्रज्वलित केला आहे.”
पत्रकार अबरार मिर्झा





