गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.!!!
भडगाव, प्रतिनिधी :-
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने भडगाव नगरपरिषदेचे गटनेते लखीचंद भाऊ पाटील तसेच महिला व बालकल्याण सभापती व नगरसेविका सौ. समीक्षा ताई पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. 28 जून, रविवार रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस भरती, सैन्य भरती आणि विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव करण्याबरोबरच त्यांना पुढील शैक्षणिक व करिअरविषयक दिशा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले गुण, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअरच्या विविध संधी, व्यक्तिमत्त्व विकास तसेच जीवनातील ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करू शकतात, या विश्वासातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गुणवंतांचा गौरव आणि भावी पिढीला नवी दिशा देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.





