अशोक खरात प्रकरणाचे पडसाद; रुपाली चाकणकरांचा राजीनामा, जळगावच्या प्रतिभा शिंदे आघाडीवर
जळगाव प्रतिनिधी :
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, या प्रकरणाचे थेट पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात उमटले आहेत. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील नेत्या प्रतिभा शिंदे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणाची चौकशी सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या छायाचित्रांमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरात यांची पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारामुळे विरोधकांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव आणला होता
वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावरूनही त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. माध्यमांमध्ये कोणताही ठोस पुरावा नसताना होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पोलिस महासंचालकांकडे मागणी केली असल्याचेही स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नव्या नेतृत्वाच्या शोधाला वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिभा शिंदे या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेल्या शिंदे सध्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या माध्यमातून त्यांनी आदिवासी, वंचित आणि शेतकरी घटकांच्या हक्कांसाठी उत्तर महाराष्ट्रात प्रभावी लढा उभारला आहे.
प्रतिभा शिंदे या आक्रमक शैली, संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनसंपर्क यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्या मजबूत दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्या नावावर पक्षातील वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाचे पडसाद पुढील काही काळ राज्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर कोणाच्या गळ्यात माळ पडणार, याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, जळगाव जिल्ह्याकडे यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
