अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; भडगाव शहर सजेत महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांना वेग.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे भडगाव शहर सजेतील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
भडगाव शहर सजेमध्ये एकूण पाच शिवारांचा समावेश असून, त्यापैकी जुना महिंद्रा रस्ता शिवार, एरंडोल रस्ता शिवार, अमडदे शिवार आणि वाक शिवार येथील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. हे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी श्री. एम. जे. खाटीक व कृषी सहाय्यक श्रीमती काजल ढोकळे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत केले.
उर्वरित शिवारांतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित अधिकारी सातत्याने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, कृषी सहाय्यक श्रीमती काजल ढोकळे यांच्याकडे भडगाव शहर सजेसह आणखी तीन सज्यांचा अतिरिक्त कार्यभार असूनही त्या नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी महसूल व कृषी विभागाकडून अचूक व पारदर्शक पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असून, शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, उर्वरित शिवारांतील पाहणीचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.





