कजगाव येथे पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था;नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी अमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे गावातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः जुन्या गावातील महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या रस्त्यांवरील समस्या अधिकच गंभीर बनली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.





