गोंडगाव प्रकरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने; आरोपांना शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर
भडगाव प्रतिनिधी :-
गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणावरून भडगावमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
नगरपरिषद गटनेते लखीचंद पाटील यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावत, गोंडगाव प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधीला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. “या प्रकरणाचा आमदार किशोर पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेवर कोणाचाही प्रभाव पडू शकत नाही. त्यामुळे आमदारांवर करण्यात येणारे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून, त्यामागे केवळ राजकीय हेतू आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत, विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी एका अत्यंत संवेदनशील आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “गोंडगाव प्रकरणाला तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरच भाजप नेत्यांना अचानक जाग कशी आली? या काळात ते कुठे होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्यांवरच आता आरोप करून भाजप केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना लखीचंद पाटील म्हणाले की, गोंडगाव प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळावा, हीच शिवसेनेची ठाम भूमिका आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर पक्षाचा पूर्ण विश्वास असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबासोबत शिवसेना आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे असून, न्याय मिळेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कन्या प्रियंका पाटील यांचाही उल्लेख करत, त्यांनी पीडित कुटुंबाला वेळोवेळी आर्थिक मदत केली असून पीडितेच्या भावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही त्या स्वतः करत असल्याचा दावा केला. केवळ राजकारण न करता संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहण्याचे काम आमदार कुटुंबाने केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गोंडगाव प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असून, संवेदनशील प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. मात्र, पीडितेला न्याय मिळणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखणे हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे प्रथम नागरिक जाहगीर मालचे, नगरपरिषद गटनेते लखीचंद पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, नगरसेवक विजयकुमार भोसले, माजी नगरसेवक शाम पाटील, देवा अहिरे, संतोष महाजन, जग्गू भोई, महेंद्र तातर, तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष आबा चौधरी, बबलू देवरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





