Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

कासोदा शहरात पोलिसांची धडक वाहन तपासणी मोहीम; ६ संशयित वाहने जप्त
कासोदा शहरात पोलिसांची धडक वाहन तपासणी मोहीम; ६ संशयित वाहने जप्त
कासोदा प्रतिनिधी :-
कासोदा शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कासोदा पोलिसांनी शुक्रवारी (दि. १२ जून) अचानक वाहन तपासणी मोहीम राबवली. या धडक कारवाईमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या मोहिमेची शहरभर चर्चा सुरू आहे.
कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये मेन रोड, सादिकशहा बाबा दर्गा परिसर, बिर्ला चौक, सेंट्रल बँक परिसर, स्वामी समर्थ केंद्र तसेच पारोळा चौफुली या भागांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान पोलिसांनी सुमारे ३० ते ३५ वाहनांची चौकशी व झाडाझडती घेतली. विशेषतः ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले चालक, ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकीस्वार, तसेच नंबर प्लेट नसलेली किंवा संशयास्पद वाहने यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मोहीमेदरम्यान आवश्यक कागदपत्रे नसलेली व संशयास्पद आढळलेली ६ वाहने जप्त करून कासोदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. संबंधित वाहनांची मालकी, कागदपत्रे आणि इतर बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत कठोर इशारा दिला. “विना नंबर प्लेट वाहने चालविणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणे किंवा वाहतुकीचे नियम मोडणे याबाबत यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल नितीन सूर्यवंशी, योगेश पाटील, दीपक देसले, श्रीकांत ब्राम्हणे, सोनू पाचुंदे आणि राकेश खोंडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या अचानक तपासणी मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



