Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

लोण प्र. ऊ. येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच.!!!
लोण प्र. ऊ. येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच.!!!
लोण प्र. ऊ., ता. भडगाव (प्रतिनिधी, महाराष्ट्र डायरी ) – लोण प्र. ऊ. गावात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावातील अनेक भागांमध्ये नळपाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात हातपंप नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. तसेच पूर्वी अस्तित्वात असलेल्या तीन विहिरींपैकी काही विहिरींचे अस्तित्व संपुष्टात आल्याने पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरपंच अॅड. बी. आर. पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन गावातील गंभीर परिस्थितीची माहिती देण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने गावातील जलस्रोत आटत चालले असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन सरपंच अॅड. बी. आर. पाटील यांनी खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच अजित मुसंडे यांच्या शेतातील विहिरीतून टँकरने पाणी आणून ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडण्यात येत असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेले काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत अनेकदा संबंधित ठेकेदारांना भेटूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचे सांगण्यात आले.
सरपंच अॅड. बी. आर. पाटील यांनी सांगितले की, “पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून आवश्यक कामे पूर्ण करावीत व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.”
यासंदर्भात १२ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या तक्रार अर्जावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १२ जून २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी मनोज देवरे यांनी दोन ते तीन दिवसांत ठेकेदारामार्फत काम सुरू करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंचांनी सांगितले.
सरपंच अॅड. बी. आर. पाटील म्हणाले, “एकीकडे मुख्यमंत्री समृद्धी योजना सुरू असताना आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होत नाही. कागदोपत्री असलेले ठेकेदार सुनील पाटील यांना आम्ही कधीही कामाच्या ठिकाणी पाहिलेले नाही. त्यांचा संपर्क क्रमांकही उपलब्ध होत नाही. दरम्यान, आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने व स्वखर्चाने पाईपलाईन टाकून तसेच टँकरद्वारे पाणी आणून गावाला पाणीपुरवठा करत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “मनोज देवरे यांनी दोन ते तीन दिवसांत प्रश्न सोडविण्याची हमी दिल्याने नियोजित उपोषणाचा निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे.”
दरम्यान, गावातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा तसेच जल जीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



