तांदूळवाडी फाट्यावर एसटी थांबवण्यावरून वाद; ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा,बस थांबवण्याबाबत गैरसमजातून शाब्दिक वाद; प्रवाशांकडूनही स्पष्टीकरण, एसटी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी.!!!

69 / 100 SEO Score

तांदूळवाडी फाट्यावर एसटी थांबवण्यावरून वाद; ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

 

बस थांबवण्याबाबत गैरसमजातून शाब्दिक वाद; प्रवाशांकडूनही स्पष्टीकरण, एसटी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणीIMG 20260608 WA0969

भडगाव ता. प्रतिनिधी आमीन पिंजारी 

कजगाव, ता. भडगाव, दि. 8 जून : कजगाव जवळील तांदूळवाडी फाट्यावर एसटी बस नियमित थांबवण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तांदूळवाडी ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने ४ मे २०२६ रोजी चाळीसगाव व पाचोरा आगार व्यवस्थापकांना तांदूळवाडी फाट्यावर एसटी बस थांबवण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 8 जून) सकाळी सुमारे ११ वाजता चाळीसगाव–पारोळा मार्गावरील एसटी बस तांदूळवाडी फाट्यावर थांबवण्यात आली नसल्याचा गैरसमज झाल्याने ग्रामस्थांनी चालक व वाहकांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. परिस्थिती चिघळत असल्याने बस कजगाव येथील पोलीस चौकीत आणण्यात आली. त्यानंतर कजगाव येथील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

मात्र, बसमधील काही प्रवाशांनी यावेळी सांगितले की, एसटी बस तांदूळवाडी फाट्यावर थांबवण्यात आली होती. काही गैरसमजातून हा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, संबंधित बसवर गाडीचा मार्ग दर्शविणारा फलक लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे प्रवाशांना गाडीच्या मार्गाबाबत संभ्रम निर्माण होऊन मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कजगाव–चाळीसगाव मार्गावरील तांदूळवाडी फाट्यावर बस थांबवण्यास परवानगी असतानाही अनेकदा चालक व वाहकांकडून या ठिकाणी बस थांबवण्याबाबत टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, उपचारासाठी चाळीसगावला जाणारे रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तांदूळवाडी फाट्यावर नियमितपणे एसटी बस थांबवण्याच्या सूचना चालक व वाहकांना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, तांदूळवाडी फाट्यावर एसटी बस थांबवण्याबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच नकुल पाटील व ग्रामस्थांनी दिला आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!