आपल्या भीतर बसलेल्या अहंकाराची बळी द्या — मरकजी इमाम आले मुस्तफा,नगरदेवळा येथे ईद-उल-अजहा उत्साहात; जागतिक शांततेसाठी विशेष दुआ

आपल्या भीतर बसलेल्या अहंकाराची बळी द्या — मरकजी इमाम आले मुस्तफा,नगरदेवळा येथे ईद-उल-अजहा उत्साहात; जागतिक शांततेसाठी विशेष दुआ

पाचोरा ता.प्रतिनिधी :-

“कुरबानी द्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्या भीतर बसलेले अहंकार, क्रोध, लालसा आणि अज्ञान यांची कुरबानी द्या. माणसाने आपल्या मनातील वाईट प्रवृत्तींचा त्याग करून मानवतेच्या मार्गावर चालणे, हाच ईद-उल-अजहाचा खरा संदेश आहे,” असे प्रतिपादन नगरदेवळा जामा मस्जिदचे मरकजी इमाम मौलाना आले मुस्तफा यांनी केले.

नगरदेवळा येथे गुरुवार, 28 मे रोजी मुस्लिम बांधवांकडून ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सकाळी 7.30 वाजता सर्व मुस्लिम बांधव जामा मस्जिद येथे एकत्र जमले. त्यानंतर तकबीरच्या घोषणांसह ईदगाहकडे प्रस्थान करण्यात आले.

ईदगाह येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. नमाजनंतर अल्लाहचे आभार मानत विशेष दुआ करण्यात आली. यावेळी मरकजी इमाम मौलाना आले मुस्तफा यांनी आपल्या भाषणातून ईद-उल-अजहाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “ईद-उल-अजहा हा केवळ जनावरांची कुरबानी देण्याचा सण नसून, स्वतःच्या मनातील अहंकार, द्वेष, क्रोध, लालसा आणि अज्ञान यांचा त्याग करण्याची शिकवण देणारा पवित्र दिवस आहे. अल्लाहने ज्यांना संपत्ती दिली आहे, त्यांनी गरीब, अनाथ, विधवा आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे, हाच या सणाचा खरा उद्देश आहे.”

यावेळी देशात आणि जगात शांतता नांदावी, भारत देश विकसित व्हावा, समाजात बंधुभाव वाढावा तसेच जगभर सुरू असलेले युद्ध आणि हिंसाचार थांबून मानवतेचा संदेश अधिक बळकट व्हावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमास मौलाना जमशेद रजा, मौलाना इश्तियाक रजा, पोलीस उपनिरीक्षक गंगे साहेब, जामा मस्जिद चेअरमन नूर बेग, गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अफरोज रहीम, जावेद रहीम, अहतेशाम शेख, वसीम पटवे, मुश्ताक खान, सय्यद इमरान अली, गनी सेठ, अन्नू मेंबर, जुबेर खान, सादिक बागवान, वसीम शेख, जावेद शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *