लासगाव येथे सामूहिक कुर्बानीतून सामाजिक ऐक्याचा संदेश,गरीब व गरजूंसाठी मांसाचे वाटप; उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

लासगाव येथे सामूहिक कुर्बानीतून सामाजिक ऐक्याचा संदेश,गरीब व गरजूंसाठी मांसाचे वाटप; उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे ईद-उल-अजहाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामूहिक कुर्बानीची परंपरा यंदाही उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली. गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सर्व बकरे एका ठिकाणी जमा करून धार्मिक परंपरेनुसार सामूहिक कुर्बानी केली. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

इस्लाम धर्मातील शिकवणीनुसार कुर्बानीच्या मांसाचे तीन हिस्से करण्यात आले. त्यातील एक हिस्सा स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी तर तिसरा हिस्सा गरीब, गरजू व वंचित नागरिकांना वाटप करण्यात आला. गावातील अनेक गरजू कुटुंबांना या माध्यमातून मदतीचा हात मिळाला.

या सामूहिक उपक्रमासाठी लासगावचे सरपंच इमरान सर, अकबर मिस्त्री, वाहिद देशमुख तसेच खलील दादा देशमुख यांनी पुढाकार घेतला. गावातील सर्व समाजबांधवांनी एकत्रितपणे निर्णय घेत प्रत्येकाने आवश्यक हिस्सा काढून उर्वरित मांस संपूर्ण गावात वाटप करण्यात आले. त्यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.

गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

“सामूहिक कुर्बानीमुळे गावात एकात्मतेचा संदेश गेला असून गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे समाधान मिळाले,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

“गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गावात बकराईद निमित्त सर्व समाजबांधव एकत्र येऊन सामूहिक कुर्बानीची परंपरा जपली जात आहे. या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होत आहे,” अशी माहिती खलील दादा देशमुख यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *